घरगुती गॅस तसेच सीएनजी ‘एवढ्या’ रुपयांनी महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती गॅस तसेच सीएनजीच्या किमतीमध्ये एक एप्रिलपासून वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. एक एप्रिलला ही दरवाढ झाल्यास ती सलग चौथी दरवाढ ठरेल. गेल्या वर्षी एक ऑक्टोबरलादेखील गॅसदरांत १० टक्क्यांनी वाढ झाली होती.

घरगुती वापराचा पाइप गॅस व वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या सीएनजीच्या दरांमध्ये देशभरात एक एप्रिलपासून सुमारे १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सीएनजीचे दर प्रतिकिलो ४४.२२ रुपये होते. तर, पाइप गॅसचा दर सध्या २९ रुपये आहे. या दोन्ही दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्यास हे दर अनुक्रमे ४८.६४ व ३२ रुपये होण्याची शक्यता आहे. ओएनजीसी, रिलायन्स यांसारख्या नैसर्गिक वायू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना या दरवाढीमुले लाभ होईल.

या कारणाने किमती वाढणार
देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये दरवर्षी एक ऑक्टोबर व एक एप्रिलला वाढ केली जाते. यासाठी अमेरिका, रशिया, कॅनडा आदी नैसर्गिक वायू उत्पादनांत अग्रेसर असणाऱ्या देशांतील सरासरी दरांचा आधार घेतला जातो. एक एप्रिलपासून देशभरात लागू होणाऱ्या सीएनजी, घरगुती पाइप गॅस व अन्य गॅसदरांसाठी अमेरिका, रशिया, कॅनडा आदी देशांत एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत झालेली गॅस दरवाढ विचारात घेतली जाणार आहे.

सरकारी सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अमेरिका, रशिया, कॅनडा या देशांत गॅसदरांत १० टक्के वाढ झाली होती. त्यानुसार एक एप्रिल पासून त्याच दराप्रमाणे देशात गॅसदरवाढ लागू होऊ शकते.