ठाकरे चित्रपटाला मराठीत नवाजुद्दीनच आवाज देणार होता पण…

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा चित्रपट येत आहे. त्यातील बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीने साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यातील हिंदीतील चित्रपटात बाळासाहेबांच्या भुमिकेला नवाजुद्दीननेच आवाज दिला आहे. तो प्रेक्षकांना आवडला.

मात्र मराठीत बाळासाहेबांच्या भुमिकेला अभिनेता सचिन खेडेकरचा आवाज देण्यात आला आहे. हा आवाज प्रेक्षकांना रुचला नाही. बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वापेक्षा हा आवाज अगदीच नाजूक वाटतो, अशा टीका सोशल मीडियावर करण्यात आल्या. त्यामुळे आता मराठीत बाळासाहेबांच्या भुमिकेला चेतन शशितल यांचा आवाज देण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.

मराठी सिनेमात बाळासाहेबांच्या भुमिकेला नवाजुद्दीन सिद्दीकीच आवाज देणार होता, अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी दिली.खेडेकर यांच्या आवाजाबद्दल आम्ही स्वत: समाधानी आहोत, असं राऊत यांनी सांगितले. मात्र त्याचबरोबर त्यांनी मराठीमधील बाळासाहेबांचा आवाज बदलण्यात येईल का?, या प्रश्नावर काहीही स्पष्ट उत्तर दिले नाही.

मात्र हिंदीत नवाजुद्दीनचाच आवाज राहिल हे स्पष्ट केले. पण त्याचबरोबर मराठीमध्येही नवाजुद्दीनचाच आवाज राहवा यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचेही सांगितले. ‘मराठीमध्येही नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी नवाजुद्दीन मराठी शिकले. बोलायला लागले. तरी मराठी बोलताना उच्चारात जो सफाईदारपणा असायला पाहिजे तो त्यांच्या बोलण्यात नव्हता. हा सफाईदारपणा बाळासाहेबांच्या वक्तव्यात नेहमी असायचा. मात्र नवाजुद्दीन सफाईदारपणे मराठी बोलण्यात थोडेसे कमी पडले. नाहीतर नवाजु्द्दीन यांचा आवाज तेथे चालला असता, असं राऊत यांनी सांगितलं.

आता आम्ही मराठीमधील आवाजावर काम करत असून येत्या दोन तीन दिवसात याबद्दलचा निकाल लागेल, अशी माहिती राऊत यांनी दिली.दरम्यान, सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात टीका झालीच. मात्र त्यासोबतच आवाजाचे जादुगार चेतन शशितल यांच्या आवाजात पुन्हा एकदा मराठीत डबिंग करण्यात याव अशी मागणीही सोशल मीडियावर करण्यात आली. त्यामुळे आता दोन-तीन दिवसात काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.