काळवटी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – शहरासाठी राखीव पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या काळवटी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याचे उघडकीस आले आहे. नेमके कशामुळे हा प्रकार होत आहे हे अद्याप निश्चित नसले तरी तलावाचे पाणी दुषित झाल्याने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे शहरातील नागरिकात काळजीचे वातावरण असून या माश्यांच्या मृत्युच्या कारणाचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी होती आहे.

अंबाजोगाईसाठी काळवटी तलावाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मांजरा धरणाचे पाणी संपल्यानंतर याच तलावातून अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील वर्षीच्या पावसात हा तलाव पूर्ण भरला होता. मात्र, यावर्षी पावसाने दगा दिल्याने तलावात पाणी कमी आहे. मांजरा धरणही मृत साठ्यात असल्याने येणारा उन्हाळा कसोटीचा ठरणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन या तलावातील सर्व मोटारी बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, मागील काही दिवसापासून एका वेगळ्याच समस्येने डोके वर काढले आहे. तलावात दररोज मोठ्या संख्येने मृत मासे दिसून येत आहेत. या ठिकाणी जलतरणासाठी नियमित जाणाऱ्या व्यक्तींच्या सर्वप्रथम ही बाब लक्षात आली. मृत माश्यांमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली असून पाण्याचाही घाण वास येण्यास सुरुवात झाली आहे. मासेमारी करणारे काही व्यक्ती जमेल तसे हे मृत मासे तलावाच्या काठाला आणून टाकत आहेत तर काही मासे सडल्यामुळे पाण्यातच विरघळत आहेत. हे मासे नेमके कशामुळे मृत होत आहेत याबद्दल कोणाकडेही निश्चित माहिती नाही. इतर वेळेला मृत माश्यावर तुटून पडणारे कावळे देखील आता त्यांना शिवत नाहीत. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे याबाबत खुलासा होणे गरजेचे बनले आहे. पाणी दुषित झाल्यामुळे जर ही परिस्थिती उद्भवली असेल तर आगामी टंचाईच्या काळात इथूनच अंबाजोगाईला पिण्यासाठी पाणीपुरवठा होणार असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने या समस्येचा निपटारा करावा अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही.

तलावात अनोळखी वेल

दरम्यान, या तलावात मागील काही दिवसापासून अनोळखी वेल दिसत असून त्याची पाने पाण्यावर तरंगत असतात. ही वेल दिसल्यापासूनच मासे मृत्युमुखी पडण्याचे आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे असा दावा येथे नियमित येणाऱ्या काही नागरिकांनी केला. कदाचित तरंगणारी विषारी पाने खाल्ल्यामुळेच मासे मरत असावेत असा संशय त्यांना आहे.