पोलीस घडामोडी

सीबीआय प्रमुख पदाच्या शर्यतीत ‘हे’ ३ वरिष्ठ आयपीएस (Sr. IPS) अधिकारी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयच्या संचालक पदावरून अलोक वर्मा यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशिक्षण विभागा (डीओपीटी) ने संस्थेच्या नव्या संचालकांचा शोध सुरू केला आहे. विभागाच्या महासंचालक पदी असलेल्या १० आयपीएस अधिकाऱ्यांचा या यादीत समावेश असल्याची माहिती मिळते आहे.
हे ऑफिसर्स आहेत शर्यतीत आघाडीवर 
–आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल
–उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह,
–राष्ट्रीय अन्वेषण संस्था (एनआयए) चे प्रमुख वाय. सी. मोदी
हे तीन ऑफिसर्स  या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या पदाकरिता १९८३, १९८४ आणि १९८५च्या बॅचच्या अधिकाऱ्यांचा या यादीत समावेश आहे.
अशी केली जाईल निवड 
डीओपीटीद्वारे ३ ते ४ अधिकाऱ्यांची नावे सीबीआयच्या संचालकपदासाठी निवडली जातील. त्यानंतर ती निवड समितीकडे पाठवण्यात येतील. या त्रिसदस्यीय निवड समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असेल. समितीद्वारे यापैकी एका नावावर सीबीआय महासंचालक पदाच्या २ वर्षांच्या कार्यकाळासाठी शिक्कामोर्तब केले जाईल. वर्मा यांचा कार्यकाळ ३१ जानेवारीला पूर्ण होणार होता. नव्या नावाचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.
 पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल प्रमुख दावेदार
सर्वोच्च न्यायालयद्वारे २००४ मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आयपीएसचे ४ सर्वांत जुन्या बॅचचे  सेवेत अधिकारी सीबीआयच्या संचालक पदाचे दावेदार असतात. सेवाज्येष्ठता आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांमधील चौकशीचा अनुभव यातून अधिकाऱ्यांच्या यादीत १९८३ च्या बॅचचे अधिकारी आणि गृह मंत्रालयातील विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) रीना मित्रा, उत्तर प्रदेशचे महासंचालक ओ.पी. सिंह आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक राजीव राय भटनागर यांचीही नावे समाविष्ट आहेत. राष्ट्रीय गुन्हेगारी आणि न्यायवैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक एस. जावेद अहमद, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)चे महासंचालक रजनीकांत मिश्रा, भारत -तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) प्रमुख एस. एस. देवस्वाल यांचा समावेश आहे.
या सर्वांमध्येही १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. रीना मित्रा आणि मोदी यांना सीबीआय आणि भ्रष्टाचारविरोधी शाखांमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.जयस्वाल यांनी संशोधन आणि पृथक्ककरण विंग (रॉ) मध्येही सेवा दिली आहे. ते मुंबई पोलीस आयुक्त बनण्याआधी कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या