आमचे सरकार आले तरी टीका करण्याचा अधिकार : सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येकाला आपलं म्हणण मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येक व्यक्तीला टीका करण्याचा आधिकार आहे. त्यामुळे उद्या आमचे सरकार आले तरी पालेकरांना टिका करण्याचा अधिकार आहे असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण अमोल पालेकर यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. बारामती लोकसभा मतदार संघातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. या कार्य़क्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, पालेकर असोत किंवी कोणीही प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार संविधानेने दिला आहे. त्याच प्रमाणे त्यांना टीका करण्याचा अधिकार देखील दिला आहे. त्यामुळे पालेकरांच्या पाठीशी मी उभी आहे. उद्या आमचे सरकार आले तरी त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. पालेकरांना बाेलू न देने हा सरकारच्या विराेधात बाेलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. याचा मी जाहीर निषेध करते.

मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला हाेता. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाविरोद्ध आपली भूमिका मांडली होती, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले. तर, भाषण लवकर संपवण्यासही सांगितले होते.