‘हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते’ : एकाच ऑलिम्पिकमध्ये ५ ‘गोल्ड’ जिंकणाऱ्या मुलीची प्रतिक्रिया

मोनॅको : वृत्तसंस्था – हिंदू धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते, असं सांगत एकाच ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकांची कमाई करणारी जलतरणपटू मिसी फ्रँकलिननं हिंदू धर्माचं कौतुक केलं आहे. मी ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र मला हिंदू धर्म आवडतो असंही ती म्हणाली. 23 वर्षांच्या फ्रँकलिननं गेल्याच वर्षी निवृत्ती स्वीकारत होती. तिच्या या निवृत्तीने सर्वांनाच धक्का बसला होता. परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे निवृत्त होत असल्याचं तिनं सांगितलं होतं.

हळूहळू तिच्या मनात अध्यात्माविषयी ओढ निर्माण झाली

फ्रँकलिननं ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधीत्व केलं होतं. परंतु 23 वर्षांच्या फ्रँकलिननं गेल्याच वर्षी निवृत्ती स्वीकारली. यानंतर तिने केवळ मनोरंजन म्हणून योग करण्यास सुरुवात केली. त्यातून तिला हिंदू धर्माची माहिती मिळाली. यानंतर हळूहळू तिच्या मनात अध्यात्माविषयी ओढ निर्माण झाल्याचे दिसून आले. यानंतर आता ती जॉर्जिया विद्यापीठात धर्माशी संबंधित अभ्यास करत आहे असे समजत आहे.

‘हिंदू धर्मग्रंथ वाचून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळालं’

फ्रँकलिननं लॉरेस विश्व खेल पुरस्कारावेळी तिच्या धर्माशी संबंधित अभ्यासाची माहिती दिली. यावेळी बोलताना ती म्हणाली, “गेल्या वर्षभरापासून माझा अभ्यास सुरू आहे. हिंदू धर्मग्रंथ वाचून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळालं. त्यामुळे माझे डोळे उघडले. विविध संस्कृती, त्यासंबंधित माणसं, त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरा याबद्दल वाचन करायला मला आवडतं.”

‘मी ख्रिश्चन असून मला हिंदू धर्म आवडतो’

पुढे बोलताना ती म्हणाली की, “मी ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र मला हिंदू आणि इस्लाम धर्म जास्त आवडतात. या दोन्ही धर्मांबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यामुळेच मला दोन्ही धर्मांबद्दल खूप कुतूहल आहे. या धर्मांबद्दल वाचन केल्यानंतर त्यांच्याविषयीची ओढ आणखी वाढली.” असं लंडन ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकं पटकावणाऱ्या फ्रँकलिननं सांगितलं.

फ्रँकलिनला हिंदू धर्माबद्दल खूप माहिती आहे. इतकेच नाही तर, फ्रँकलिनची अभ्यासातील प्रगती अतिशय उत्तम आहे.रामायण आणि महाभारताबद्दल तिला खूप आकर्षण आहे. सध्या ती हे दोन्ही ग्रंथ वाचत आहे. हे ग्रंथ वाचतानाचा आपला अनुभव सांगताना फ्रँकलिन म्हणाली की, “त्या महाग्रंथामधल्या गोष्टी मला अविश्वसनीय वाटतात. त्यातील देवांविषयी जाणून घेणं मला खूप आवडतं. या दोन्ही ग्रंथांचं वाचन करण्याचा अनुभव सुंदर आहे. महाभारतातली सर्व नावं माझ्या लक्षात नाहीत. अनेकदा माझा थोडा गोंधळ उडतो. मात्र रामायणातील राम आणि सीतेबद्दल वाचायला मला प्रचंड आवडतं.” असं ती म्हणाली.