माढ्यातून मी निवडणूक लढणार नाही : विजयसिंह मोहिते पाटील 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – शरद पवारच माढ्याचे उमेदवार असणार आता याची फक्त औचारिक घोषणाच बाकी आहे अशा वेगवान घडामोडी नजीकच्या काही दिवसात घडल्या आहेत. आता माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा देखील केली आहे. या घोषणे बरोबरच शरद पवार हेच माढ्याचे उमेदवार असणार या शक्यतेला खात्री मिळाली आहे.

पक्षात गटबाजीचे राजकारण फोफावत आहे असे दाखवून त्या गटबाजीला संपवायला आपणासच तिथे उमेदवारी करणे भाग आहे हि शरद पवारांची भूमिका १० वर्ष जूनी आहे. अर्थात २००९ साली शरद पवार यांनी अशीच पक्षांतर्गत गटबाजी वाढीस लागल्याची सबब देत लोकसभा निवडणुकीत माढ्याची उमेदवारी स्वतःकडे घेतली होती. तशाच प्रकारची खेळी शरद पवार यांनी या वेळी उमेदवारी स्वतःकडे ठेवण्यासाठी केली आहे. आज मुंबईत शरद पवार, पक्षाच्या मुख्य नेत्यांशी उमेदवार निश्चिती संदर्भात बैठक घेणार आहेत. कदाचित या बैठकी नंतर शरद पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे.

बुधवारी सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीत शरद पवार यांच्या माढ्यातील उमेदवारी बाबत सर्वच नेत्यांनी एकमत केले आहे. या बैठकीला माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी करावी अशी मागणी सर्व प्रथम मी केली होती. शरद पवार यांनी उमेदवारी करावी यावर पक्षातील सर्वच नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे माढ्यातून मी उमेदवारी करणार नाही असे विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणले आहे. आपण पक्षावर नाराज नसून माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच नेते एक दिलाने प्रयत्न करतील असे विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले आहेत.