#PulwamaAttack : ‘भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत नाही तोवर मी ते गाणं गाणार नाही’

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (कुमार चव्हाण) – ‘जोपर्यंत भारत पुलवामा हल्ल्याचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत नाही तोपर्यंत मी माझं गाजलेलं गाणं ‘हुस्ना’ गाणार नाही असे म्हणत पुयष मिश्रा यांनी पुलवामा दहशतादी हल्ल्याचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. काल पुण्यात त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. यानंतर त्यांनी या हल्ल्याविषयी आपल्या भावना प्रेक्षकांसमोर मांडल्या.

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर भीषण आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली. देशातील प्रत्येक नागरिकाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. अनेक बाॅलीवूड कलाकारांनीही याचा निषेध केला तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातही दिला आहे. अशातच आता अभिनेते, संगीत दिग्दर्शक, गीतकार, संहिता लेखक, गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पियुष मिश्रा यांनीही या हल्ल्याचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. त्यांच्या अत्यंत जवळचं आणि प्रेक्षकांच्या मनाला मोहिनी घालणारं, अत्यंत गाजलेलं गाणं ‘हुस्ना’ तोपर्यंत गाणार नाही जोपर्यंत भारत या हल्ल्याचे सडेतोड उत्तर पाकिस्तानला देणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ADV

पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिर येथे त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितांसमोर आपल्या भावना मांडल्या. त्यांनी गाण्यांचे सादरीकरण करत असताना कोणते गाणे गाऊ असा प्रश्न विचारल्यानंतर प्रेक्षकांनी ‘हुस्ना’चा गजर केला. यानंतर त्यांनी सर्व गाणी सादर केली. परंतु हुस्ना गाणे त्यांनी सादर केले नाही. कार्यक्रमानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

पियुष मिश्रा म्हणाले की, “पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये कोणाचा भाऊ, कोणाचा पती तर कोणाचा मुलगा शहीद झाला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो आहे. मी एक जवान नसून कलाकार आहे. जवान असतो तर हातात बंदूक घेऊन सीमेवर लढलो असतो. परंतु मी कलाकार आहे म्हणून या हल्ल्याचा निषेध वेगळ्या पद्धतीने करत आहे.”

पुढे बोलताना पियुष मिश्रा म्हणाले की, “हुस्ना हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे. मी मुद्दाम आज ते गाणं गायलं नाही. विशेष म्हणजे मी हे गाणं गायलं नाही याचा मला खूप त्रास होणार आहे. परंतु मी हे गाणं सादर न करून पुलवामा हल्ल्याचा निषध करत आहे. मी हे गाणं तोपर्यंत गाणार नाही जोपर्यंत भारत या हल्ल्याचं सडेतोड उत्तर पाकिस्तानला देत नाही. मला हे गाणं गायला न मिळाल्याने आणखी कितीही त्रास झाला तरी चालेल.”

इतकेच नाही तर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीही त्यांनी भारत आणि येथे उपस्थित प्रेक्षक माझी फॅमिली आहे असं म्हणत कार्यक्रमाला सुरवात करण्यापूर्वी पुलवामातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.