विखे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही : अशोक चव्हाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –अहमदनगरच्या लोकसभा जागे वरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये ऐक्य होण्यास अद्याप अवकाश असतानाच सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आघाडीने आपल्याला तिकीट नाकारले तर आपण अपक्ष उभा राहू असे सुजय विखे पाटील काल शनिवारी म्हणाले होते. याच वक्तव्या संदर्भात अशोक चव्हाण यांना विचारले असता अशोक चव्हाण म्हणले कि, सुजय विखे पाटील यांच्या कालच्या विधानाचे मी कदापि समर्थन करणार नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नगरच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन घेऊन त्यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधले आहे. त्याच पत्रकार परिषदेत त्यांना सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्या बद्दल विचारले असता त्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे. आपण सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याचे कदापि समर्थन करणार नाही. कारण आम्ही आघाडी धर्माचे पालन करत आहे. त्याच प्रमाणे आमचे त्यांच्या मागणीकडे लक्ष असून आम्ही अहमदनगरची लोकसभेची जागा प्रथम प्राधांन्याने मागितली आहे आणि इथून पुढच्या बैठकीत हि मागत राहणार आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हणले आहे. आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून प्रकाश आंबेडकरांशी हि आघाडी संदर्भात आम्ही बोलणी करणार आहोत असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील
पारनेर तालुक्यातील भाळवणी या गावी डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल युवक मेळावा घेतला होता. लोकसभा निवडणूक लढण्या बाबतची आपली भूमिका ठाम आहे. आमच्या घराण्याच्या तीन पिढ्यानी या भागाची सेवा केली असून या बळावरच आघाडीकडे आगामी काळात तिकीट मागणार आहे. जर काही कारणाने मला तिकीट मिळाले नाही अथवा माझ्या पेक्षा सक्षम उमेदवार आघाडीला या ठिकाणी उभा करू वाटला तरीही मी अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून उमेदवारी करेल असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.

उद्या सोमवार पासून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला प्रारंभ होणार असून हि पाच दिवसाची संघर्ष यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचून काढेल त्याच प्रमाणे संघर्ष यात्रे दरम्यान ज्या शहरात आम्ही जाऊ शकणार नाही अशा भागात आम्ही फेब्रुवारी महिन्यात जाणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात आम्ही ५० सभा घेणार आहोत असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.