शिवसेना म्हणे पीएम तुमचा तर सीएम आमचा ; काय होणार युतीच?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत युतीचा तिढा सुटत नाही. तोच आता या तिढ्यात अजून एक प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने आपल्या मागण्यांच्या यादीत आणखी एक मागणी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युती करण्यासाठी अजून एक मागणी केली आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्री पद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.


एनडीएनं २०१९ मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मागणीमुळे युतीत नवीन वळण येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना युतीच काही नक्की नाही. काल आलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत भाजप २५, तर शिवसेना २३ जागा लढवणार, तर विधानसभा निवडणुकीत भाजप १४५, तर शिवसेना १४३ जागा लढवणार असं समिकरण समोरं आलं होतं. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र या नव्या मागणीवरून युतीचा तिढा सुटणार नाही तर आणखी चिघळ्याची शक्यता आहे.