‘ही’ टोळी तुमच्या जिल्ह्यात असेल तर मुलांकडे लक्ष द्या..

लातूर ; पोलीसनामा ऑनलाईन: राज्यातील इतर जिल्हय़ातून अनेक विद्यार्थी शालेय स्तरापासूनच शिकण्यासाठी लातुरात येतात. शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी खासगी शिकवणी लावतात. शहरातील लातूर औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या खासगी शिकवणी उद्योग परिसरात गेल्या काही वर्षांत गुन्हय़ाचे प्रमाण वाढते आहे.अविनाश चव्हाण यांच्या खुनानंतर याची तीव्रता सर्वानाच लक्षात आली. त्यानंतरही मुलींचे छेडछाडीचे प्रकार, मुलांना धाक दाखवून मोबाईल व पसे पळवणे असे प्रकारही वाढीस लागले.
 शाळकरी मुलांमध्येही गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी सायंकाळी शहरातील दोन विद्यार्थ्यांना ते दुचाकीवरून जात असताना इतर दोघांनी दुचाकीवरून त्यांना धाक दाखवून पळवून नेले. एका अंधाऱ्या खोलीत सिगारेटचे चटके देऊन गळय़ावर चाकूही ठेवण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांनी याची दखल घेऊन स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश दिले व गेल्याच आठवडय़ात पोलीस चौकीचे उद्घाटन झाले. उच्चदर्जाचे ५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले.वस्तुत: सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अद्याप सुरूच आहे. गुरुवारी सायंकाळी शहरात झालेला हा प्रकार शिकवणी परिसरात झाल्याची चर्चा आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शाळकरी मुलांना दुचाकीवरून येणाऱ्या दुसऱ्या दोघांनी धाक दाखवून व मारहाण करून पळवून नेले.
उषाकिरण पेट्रोलपंपाच्या परिसरात नेऊन अंधारात या दोघांना पट्टय़ाने जबर मारहाण करण्यात आली व सिगारेटचे चटके देण्यात आले. तेथून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेऊन तेथे अन्य दोघांनी मारहाण केली व गळय़ावर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी दिल्याचे संबंधित मुलाचे म्हणणे आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात त्या मुलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने व शहर पोलीस उपअधीक्षक  सचिन सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन त्यात पोलीस लक्ष घालत असल्याचे ते म्हणाले