‘तर मला काम मिळणार नाही’ : शाहरुखला सतावतेय ‘ही’ चिंता

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बाॅलिवूडच्या किंग खानला आगामी चित्रपट ‘झिरो’विषयी चिंता वाटू लागल्याचे समोर आले आहे.  जर हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला तर पुढील सहा ते दहा महिने मला काम मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया शाहरुखने दिल्याचे समोर आले आहे.
शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचे चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर येतात, तेव्हा उत्सुकतेसोबतच चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरणार याची खात्री त्यांना मनात कुठेतरी असते. पण गेल्या काही महिन्यांत याउलटच चित्र पाहायला मिळालं. कारण याच दिग्गज अभिनेत्यांचे चागंले चांगले चित्रपट फ्लाॅप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात  शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’, सलमानचा ‘ट्युबलाइट’, आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ यांसारखे चित्रपट आहेत जे दणक्यात आपटताना दिसले. तर दुसरीकडे विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराना या नव्या दम्याच्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरताना दिसत होते. यामुळेच शाहरुखला आता त्याचा आगामी चित्रपट ‘झिरो’विषयी चिंता वाटू लागली आहे.
‘चित्रपटाचं भविष्य मी बदलू शकत नाही, त्यामुळे मी का त्याचा विचार करू? ‘झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही. पण जर मला माझ्या अभिनयावर आणि कलेवर विश्वास असेल तर पुढे काम मिळत राहील,’ असं शाहरुख म्हणाला.
शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचं बजेट ९० कोटी रुपये इतका होता. पण बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने जेमतेम ६४.३३ कोटी रुपये कमावले होते. ‘फॅन’, ‘रईस’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांनीही अपेक्षेपेक्षा कमीच गल्ला जमवला. आता ‘झिरो’ कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.