जवाना संदर्भातील ‘त्या’ पोस्ट सोशल मिडीयावर टाकत असाल तर सावधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथे दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून दहशतवाद्यां विरोधात संतापाची लाट पसरली. जनसामान्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. परंतु संताप व्यक्त करत असताना भावनेच्या भरात तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकत असाल तर सावधान.सोशल मीडियावर भावना व्यक्त करणाऱ्यांना CRPF ने विशेष सूचना दिली आहे.

सैनिकांवरील हल्ल्याने संतापलेल्या जनसामान्यांनी पाकिस्तान विरोधात ठिकठिकाणी घोषणाबाजी केली. याचे पडसाद जसे रस्त्यावर उमटले तसेच ते सोशल मीडियावरही उमटले. लोकांकडून अनेक भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जाऊ लागल्या. त्यातच काहीजण जवानांच्या छिन्नविछिन्न झालेल्या शरिराचे फोटोही शेअर करत आहेत. आता CRPF नेच याबाबत एक सूचना पत्र काढले आहे.

‘काही लोकांकडून जवानांच्या शरिराच्या वेगवेगळ्या भागाचे खोटे फोटो पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कोणत्याही पोस्ट्स लाईक अथवा शेअर करू नका. कोणी असं करत असेल तर संबंधित पोस्टची [email protected] इथे तक्रार करा,’ असं CRPF च्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर म्हणण्यात आलं आहे.