हेल्मेट सक्तीचे महत्व ९ वर्षाच्या मुलीला समजते… तूम्हाला का नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीला पुणेकरांनी विरोध दर्शवला असताना पर्वती भागात राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलीने पोलिसांना हेल्मेट देऊन या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

पर्वती भागात राहणारे अमित उरसळ हे बी. ई. इलेक्ट्रिकल आणि चार्टर्ड इंजिनीअर असे उच्च शिक्षित आहेत. ते इलेक्ट्रीकल कॅन्ट्रॅक्टर व सेफ्टी आणि एनर्जी ऑडिटर आहेत. काही दिवसां पूर्वी ते दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कामा निमित्त गेले होते. त्यावेळेस दत्तवाडी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी त्या निमित्त पुष्प गुच्छ देण्याऐवजी हेल्मेट भेट दिले होते. पोलीस वाहन चालविताना ते सुरक्षित राहावे म्हणून त्याला हेल्मेट भेट दिले. तसेच जनतेमध्ये हेल्मेट वापरण्या बद्दल जनजागृती निर्माण करायची असल्यास प्रथम आपण स्वतः हेल्मेट वापरले पाहिजे हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अमित उरसळ यांनी घेतली. आणि स्वतः एक हेल्मेट विकत घेऊन आपली लहान मुलगी श्रेया अमित उरसळ हिच्या सोबत येऊन त्यांनी हे हेल्मेट देविदास घेवारे यांना सुपूर्द केले. माझा हेल्मेट वापरण्याच्या मोहिमेला उस्फुर्त पाठिंबा आहे असे सांगितले.

अमित उरसळ म्हणाले, माझी मुलगी ९ वर्षाची आहे ती सध्या मुक्तांगण मध्ये इयत्ता ३री मध्ये शिक्षण घेत आहे. भविष्यात ती सुद्धा गाडी चालविणार आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे. हे तिला लहानपणा पासून समजावून सांगायचे आहे व पोलीस जर हेल्मेट घालण्यास सांगत आहेत. तर त्या पाठीमागे जनतेच्या जीविताचे रक्षण व्हावे हा त्या मागे उद्देश असेल. विनाकारण त्याला विरोध करु नये. देविदास घेवारे यांनी जनतेमध्ये हेल्मेट वापरा संबंधी जनतेमध्ये प्रबोधन व्हावे या करिता स्वतः प्रथम आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसा निमित्त हेल्मेट भेट दिली असल्याचे उरसळ यांनी सांगितले.