५ हजाराची लाच स्विकारताना तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – विटभट्टी व्यावसायिकाकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना आरमोरीच्या तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज करण्यात आली. या कारवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

यशवंत तुकाराम धाईत (वय ५५ रा. कॅम्प एरिया, रामपुरिया शाळेजवळ, काबरा किराणा मॉलच्या बाजूला, गडचिरोली) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय विटभट्टी व्यावसायिकाने गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांचा विटभट्टीचा व्यावसाय आहे. त्यांच्या व्यावसाय परवान्याची मुदत संपली आहे. परवाना नूतनीकरणासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. परवाना नूतनीकरणासाठी तहसीलदार धाईत याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी तहसीलदार धाईत याने परवाना नूतनीकरणासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. धाईत याला तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे आरमोरी तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्लवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवि राजुलवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, पोलीस शिपाई सतीश कत्तीवार,देवेंद्र लोणबळे, महेश कुकुडकार, चालक पोलीस शिपाई स्वप्नील वडेट्टीवार यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.