ब्रेकिंग : पुण्यात भरदिवसा थरार : सराफी व्यावसायिकावर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकेवर काढले आहे. सकाळी चंदननगर परिसरात गोळीबार करून एका महिलेचा खून केल्याची घटना ताजी असतानाच येवलेवाडी येथील एका सराफी व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सराफी व्यावसायिकावर गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथे गणेश ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. नेहमीप्रमाणे दुकानासमोर वर्दळ होती. दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्‍लेखोराने गणेश ज्वेलर्समध्ये असलेल्या व्यक्‍तीवर गोळीबार केला. हल्‍लेखोराची गोळी लागल्यामुळे संबंधित व्यक्‍ती जखमी झाला असून त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येवलेवाडी येथे गोळीबार झाल्याची घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम आणि इतर अधिकारी येवलेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. हल्‍लेखोराने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार केला अथवा इतर कोणत्या अन्य कारणावरून गोळीबार झाला हे अद्याप स्पष्ट होवु शकलेले नाही. सकाळी चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथे गोळीबार करून एकता ब्रिजेश भाटी (38) या महिलेचा खून करण्यात आला होता. ती घटना होवुन काही तास झाले नाही तर पुण्यात दुसर्‍या ठिकाणी गोळीबार झाला आहे.

टीप :- आताच मिळालेल्या माहितीनुसार दरोडा टाकण्यासाठी चार दरोडेखोर येवलेवाडी येथे आले होते. त्यांनी दरोडा टाकण्यासाठीच गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबार करून दरोडेखोर पसार झाले आहेत. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात गणेश ज्वेलर्समधील कामगार आम्रत परिहार (30) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार चालु आहेत.