मुलींची विक्री करणारा फरार आरोपी जेरबंद

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – गरीब घरातील मुलींच्या कुटुंबियांना पैशाचे आमिष दाखवून मध्यस्थामार्फत त्यांची मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विक्री करणाऱ्या टोळीतील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील तिघांना आतापर्यंत अटक झाली असून राजस्थानचे आणखी दोघे फरार आहेत.

ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून मुलींची मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विक्री करणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत होती. २०१७ मध्येच या टोळीचे बिंग फुटले होते. त्यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर तिघे जण फरारच होते. या तिघातील मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील विठ्ठल दत्तरामजी राखोंडे (४०) हा मध्यस्थ दोन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद दिघोरे, पोउपनि सदानंद वाघमारे, पोना़राजू पांगरेकर, बालाजी सातपूते, तानाजी येळगे, शेख जावेद, विजय आडे, सपोउपनि शाहू, रमेश खांडे, दारासिंग राठोड, घुंगरुसिंग टाक यांच्या पथकाला आरोपीची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर नांदेड शहरातील डाक कार्यालयाजवळ थांबलेला होता. स्थागुशाने त्याच्या मुसक्या आवळत विचारपूस केली असता, त्याने साथीदारांच्या मदतीने आमदरी येथील एका मुलीची मध्यप्रदेशातील शेळगाव येथे विक्री केल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. परंतु गुन्हा नोंद झाल्यापासून तो फरारच होता. या आरोपीला पुढील तपासासाठी भोकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.