क्राईम स्टोरी

१० लाखांची लाच घेताना बडतर्फ विधी अधिकारी ACB च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेवेतून बडतर्फ केलेले असताना अजूनही जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात विधी अधिकारी असल्याचे भासवत मोक्काअंतर्गत प्राप्त प्रस्तावावर अभिप्राय बाजूने देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेताना बडतर्फ विधी अधिकारी व त्याच्या साथीदाराला एसीबीने सापळा रचून  रंगेहात पकडले.

चंद्रकांत देवराम कांबळे असे बडतर्फ विधी अधिकाऱ्याचे नाव आहे. तर शशीकांत जयप्रकारा राव (वय 50 वर्षे रा वडवण मुंढवा पुणे) असे पकडलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत देवराम कांबळे हा पुणे ग्रामीण जिल्हा अधिक्षक कार्यालयात विधी अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. परंतु तरीही  कांबळे यांनी आपण पोलीस अधिक्षक कार्यालयात अजूनही विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहोत असे भासवले. त्यानंतर तक्रारदार यांच्या मालकाविरोधात संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) नुसार जिल्हा अधिक्षक पुणे येथे आलेल्या प्रस्तावावर आपण अभिप्राय देऊ शकतो असेही भासवले. हा अभिप्राय तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी खासगी व्यक्ती शशीकांत राव याच्या मार्फत दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने यासंदर्भात पडताळणी केल्यावर त्यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना दोघांनाही पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाने केली.

अशा प्रकारे कोणी लाच मागिलतल्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या