शैक्षणिक

तीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – काही कारणास्तव तुम्हाला तुमचे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुमचे वय १७ वर्षे असेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मुक्त अभ्यासक्रमासाठी उमरखेडसह जिल्ह्यातील १५ शाळांची निवड करण्यात आली असून यासाठी स्वतंत्र शिक्षण मंडळदेखील कार्यान्वित करण्यात आले आहे.

घरपोच पाठ्यपुस्तके मिळणार
या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांना घरपोच पुस्तके मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येईल. त्या वर्गाची परीक्षा दिल्यानंतर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे पुढील शिक्षणाच्या संधीही त्यांना उपलब्ध होणार आहेत. शिक्षणाची दारे खुली करताना घरपोच शिक्षण पोहोचविण्याच्या शासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

बारावीनंतर शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडलेल्या युवकांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुक्त विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. नाशिकच्या डॉ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बारावीनंतर पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी आलेल्या तसेच इतर कामांमुळे नियमित वर्गात जाऊन शिक्षण घेण्यास असमर्थ ठरणाऱ्या बऱ्याच नोकरदारांसाठी हे विद्यापीठ वरदान ठरले आहे.
रात्रशाळा आणि साक्षरता अभियानातून शाळेच्या प्रवाहाबाहेर पडलेल्या व असलेल्या बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी शिक्षण विभागाने बऱ्यापैकी प्रगती केली. त्या पाठोपाठ चौथी आणि सातवीच्या परिक्षेलाही बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या सर्व परीक्षा नियमित शालेय अभ्यासक्रमाच्या धर्तीवर घेतल्या जात होत्या. परंतू, ज्या शिक्षण मंडळाकडून हे काम सुरू होते, त्या मंडळावर नियमित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचीही जबाबदारी असल्यामुळे अभ्यासक्रमात फारसा बदल होत नव्हता. त्यामुळे शाळाबाह्य मुलांना अभ्यासक्रम समजून घेणे बऱ्याचदा जड जात होते.

कुठे कराल अर्ज
उमरखेडच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसह, महिला विद्यालय यवतमाळ, महंत भारती कन्या विद्यालय आर्णी, स्वामी विवेकानंद बाभूळगाव, शिवाजी हायस्कूल दारव्हा, दिनबाई विद्यालय दिग्रस, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय घाटंजी, शिवशक्ती माध्यमिक विद्यालय कळंब, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव, शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर, जि. प. शासकीय माध्यमिक विद्यालय पांढरकवडा, शिवाजी माध्यमिक विद्यालय पुसद, नेताजी विद्यालय राळेगाव, जनता माध्यमिक वणी व राजीव विद्यालय झरी येथे अर्ज करता येईल.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या