युवतीचा ‘दृश्यम’ स्टाईल खुन, भाजपच्या नेत्यासह ५ जणांना अटक

इंदौर : वृत्तसंस्था – जवळपास दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका २२ वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात मध्यप्रदेश पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एक भाजप नेता व त्यांच्या तीन मुलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. २०१५ मध्ये आलेल्या बॉलीवूडमधील ‘दृश्यम’ चित्रपटातून प्रेरणा घेत या सर्वांनी युवतीची हत्या केली. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी एका कुत्र्याला मारून जमिनीतही गाडले, असा धक्कादायक खुलासा पोलिसांनी यावेळी केला आहे. जगदीश करोटिया ऊर्फ कल्लू पहेलवान असे अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.

बाणगंगा भागातील रहिवासी ट्विंकल डग्रे या युवतीचा १६ ऑक्टोबर २०१६ रोजी गळा दाबून खून करण्यात आला होता. यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. पण या हत्येचा पोलिसांना कुठलाही सुगावा लागत नव्हता. पण अखेर या हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी भाजप नेते करोटिया (वय ६५) व त्यांची तीन मुले अजय (३६), विजय (३८) , विनय (३१) आणि त्यांचा सहकारी नीलेश कश्यप (२८) यांना अटक करण्यात आली, अशी माहिती इंदौरचे उपमहानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांनी दिली. करोटियाचे युवतीसोबत अनैतिक संबंध होते. पण या संबंधामुळे करोटिया यांच्या घरात समस्या निर्माण झाली होती. कारण युवतीला करोटियासोबत राहायचे होते. यानंतर करोटिया व त्यांच्या मुलांनी कट रचून ट्विंकलची निर्घृण हत्या केली.

धक्कादायक म्हणजे आरोपींनी ट्विंकलची हत्या करण्यापूर्वी अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्यम’ हा चित्रपट पाहिला होता. चित्रपटातील दृश्याप्रमाणे पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी ट्विंकलच्या हत्येनंतर एका कुत्र्याचे शव जमिनीत पुरले होते. यानंतर कोणी तरी मानवी मृतदेह पुरल्याची अफवा सगळीकडे पसरविण्यात आली. पोलिसांनी संबंधित भागात खोदकाम केल्यानंतर त्यांच्या हाताला कुत्र्याचे अवशेष सापडले. पोलिसांच्या चौकशीची दिशाभूल करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. त्यामुळे हत्येचे गूढ वाढले होते.