काकाच्या कारखाली सापडून २ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापुरातील लोणार वसाहत येथे राहणाऱ्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा काकाच्या काराखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती दीपक वडनकर असे या चिमुकलीचे नाव असून काका घरी आल्याच्या आनंदात ही चिमुकली ‘काकाची गाडी आली’ असे म्हणत आडवी आली’ याचवेळी तिच्या काकाला गाडी आवरता न आल्यामुळे भक्तीला गाडीची धडक झाली. चिमुकल्या जीवाला हा अपघात सहन न झाल्यामुळे तिचा या अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घरासमोरच घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिपक वडनकर व त्यांचे भाऊ दिनेश वडनकर हे लोणार वसाहत येथे राहण्यास आहेत. त्यांचा ट्रक बॉडी करण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी दिनेश हे कार घेऊन कामाच्या ठिकाणी गेले होते. काही वेळाने ते परत आहे. यावेळी भक्ती आजीसोबत दारात बसली होती. काकांची गाडी आली असे म्हणत ती अचानक कारसमोर आली.

दिनेश यांना कार आवरता न आल्याने तिला धडक बसली. डोक्याला गंभीर दूखापत होवून ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. अचानक घडलेल्या अपघाताने वडनकर कुटूंबिय भांबावून गेले. त्यांनी त्याचा कारमधून शाहुपूरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
कोवळ्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहून आई-वडीलांनी केलेला अक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे लोणार वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, असा परिवार आहे. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.