AUSvsIND : वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासीक विजय

मेलबर्न : वृत्तसंस्था – कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २३१ धावांचे आव्हान पार करताना भारताच्या संथ सुरुवातीनंतर धोनी आणि केदार जाधवने चौथ्या विकेटसाठी केलेल्या ११८ धावांच्या भागिदारीमुळे भारताने वनडे मालिकाही २-१ ने जिंकली.
यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १५ धावांवर रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहितने ९ धावा केल्या. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने डाव काहीसा सावरला मात्र संघाची धावसंख्या ५९ असताना शिखर (२३ धावा) बाद झाला आणि जबाबदारी  विराट व महेंद्रसिंग धोनीवर आली.
धोनी आणि विराटने संयमी खेळी करत भारताला शंभरीपार नेले. विराट ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली आणि केदार जाधवच्या साथीने विजयाच्या दिशेने कूच केली. या दोघांनीही १२१ धावांची भागिदारी रचली. धोनी आणि केदारने सुरेख फलंदाजी करत भारताला २३१ धावांचे लक्ष्य गाठून दिले. धोनीने ११४ चेंडूत ८७ आणि केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावांची खेळी रचली.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा मालिकाविजय मिळवत ऑस्ट्रेलियात नवा इतिहास रचला आहे. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच वन-डे मालिका विजय ठरला आहे, त्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासीक महत्व प्राप्त झालं आहे.