भारतीय फलंदाज अंबाती रायुडूची तडकाफडकी निवृत्ती

मुंबई : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत सातत्यपूर्ण खेळ करून 2019च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित करणाऱ्या अंबाती रायुडूने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्याने कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातील मधल्या फळीत स्वतःचे स्थान पक्के केले होते. त्यामुळेच वन डे आणि ट्वेंटी -20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने दीर्घ पल्ल्याच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

यापुढे रणजी क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही खेळणार नाही. त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला एक पत्र पाठवले आहे. ”आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्पर्धांमधील शॉर्ट फॉरमॅट मध्येच मी खेळणार आहे. मी बीसीसीआय, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन यांचे आभार मानू इच्छितो,” असे त्याने पत्रात लिहिले आहे.

त्याने पुढे लिहिले की,”हैदराबादकडून खेळायला मिळणे, ही सन्मानाची बाब आहे. आयसीएलमध्ये खेळूनही बीसीसीआयने मला खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार.”

जाहिरात