लष्करामधील महिलांच्या प्रवेशाबाबत ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत स्वत:ला सिद्ध करत आहेत. हळूहळू अनेक क्षेत्र महिला काबिज करताना दिसत आहेत. असे असले तरी लष्करामधील सैन्यात मात्र महिलांना अद्याप प्रवेश नव्हता. महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे. महिलांना लष्करातील सैनिकी विभागात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता महिलासुद्धा लष्कराच्या सैनिकी विभागात भरती होऊन शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत.

निर्मला सीतारमन यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महिलांनाही लष्कराच्या सैनिकी विभागात सामावून घेतले जाणार आहे. महिलांना आतापर्यंत प्रत्यक्ष रणांगणाशी संबंधित असलेल्या सैनिकी विभागात प्रवेश नव्हता.  लष्करामधील वैद्यकीय तसेच इतर काही विभागात प्रवेश महिलांना प्रवेश दिला गेला होता. महिलांच्या  सैनिकी विभागातील प्रवेशाबाबत असलेला अडथळा आता दूर झाला आहे. त्यामुळे महिलांना आता थेट  लष्कराच्या सैनिकी विभागात जाण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण प्रक्रियेंतर्गत 20 टक्के महिलांना सैनिकी विभागात प्रवेश दिला जाईल असे समजत आहे.

अशा अनेक महिला आहेत ज्यांना देशासाठी काही आपणही रणांगणावर लढावे असे वाटत असते. आपणही पुरुषांप्रमाणे लष्कराच्या सैनिकी विभागात असावं असं स्वप्न अनेक महिलांनी पाहिलं असेल. यापूर्वी अनेक महिलांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. परंतु असं स्वप्न पाहणाऱ्या कित्येक महिलांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी महिलांसाठी सैनिकी विभागाची दारं खुली करून दिली आहेत.