इन्स्टाग्रामचं नवीन फीचर : ‘तसले’ फोटो  ठेवणार  ब्लर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टाग्रामवर फोटो, स्टोरीज अपलोड करणे हा अनेक युजर्सच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इंटरनेट, स्मार्ट गॅझेटच्या सहज उपलब्धतेमुळे तरुणांचं सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात अल्पवयीन मुलेही मागे नाहीत. इन्स्टाग्रामवर अनेकदा अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड किंवा सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामनं एक नवीन ‘सेन्सिटिव्ह स्क्रीन’ नावाचं एक फीचर आणलं आहे. अल्पवयीन मुला-मुलींना यापासून अलिप्त राहता यावे यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने हे पाऊल उचललं आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नुकसान पोहचू नये यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मुसेरी यांनी यासंबंधीची घोषणा केली. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली होती. असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता.

सोशल मीडियावर तरुण वर्ग खूप मोठा आहे. यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी हव्या त्या उपाययोजना कराव्यात, असा आदेश इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी सोशल मीडिया कंपन्यांना दिला होता. त्यानंतर इन्स्टाग्राममध्ये हा बदल करण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामबद्दल
२०१० मध्ये इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मची स्थापना झाली होती. २०१२ मध्ये फेसबुकने इन्स्टाग्राम हे ॲप विकत घेतलं आहे. सध्या इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या ७० कोटी आहे. फोटो फिल्टर्स आणि २४ तासांपुरताच व्हीडिओ टाइमलाइनवर राहणं या दोन फीचर्समुळं फ्रीलान्सर्ससाठी इन्स्टाग्राम म्हणजे प्रमोशनसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म बनला आहे. याद्वारे व्यावसायिकांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे. ७ कोटी भारतीय हे इन्स्टाग्रामचे ॲक्टीव्ह यूजर्स आहेत.