लोकसभेसाठी पुण्याच्या जागेवर काँग्रेसचा जोरकस दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाची बोलणी निर्णायक टप्प्यात आली असताना काँग्रेस पक्षाने पुण्याच्या जागेवर जोरकसपणे दावा केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी मांडली आहे . काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही आणि तुलनेत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे , अशी मांडणी जागेवर दावा करताना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचा दावा पहिल्यांदा फेटाळून लावला.

त्यानंतरही जागावाटपाच्या बोलण्यांमध्ये पुण्यासाठी बोलणी अडल्याच्या बातम्या येवू लागल्यावर काँग्रेसचे स्थानिक नेते आणि इच्छुक खडबडून जागे झाले . काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली घाईघाईने बैठक घेण्यात आली आणि पुण्यातून काँग्रेसच निवडणूक लढविणार अशा आशयाचा ठराव त्या बैठकीत संमत केला . हा ठराव प्रदेश काँग्रेस समितीला १५ तारखेला दिला जाणार आहे . काँग्रेस पक्षाचा हा ठराव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मात करण्याचा एक प्रयत्न असे मानले जात आहे. पुण्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संमत झालेला ठराव जागावाटपाच्या बोलण्यांमध्ये प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांना उपयुक्त ठरणार आहे. लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची नांवेही ठरावाला जोडली जाणार आहेत .कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत हा राष्ट्रवादीचा दावाही खोडण्याचा एक भाग आहे. काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये माजी आमदार मोहन जोशी , माजी शहराध्यक्ष अभय छाजेड , माजी महापौर कमल व्यवहारे , माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महापालिकेतील विद्यमान गटनेते अरविंद शिंदे आदी इच्छुक आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नरेंद्र व्यवहारे यांनी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार यांच्या नांवाची शिफारस करणारे पत्र पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना दिले आहे.