मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून वाद, युवासेना अध्यक्षाचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या प्रेम प्रकरणाचा सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील युवासेना अध्यक्षाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. आकाश शशिकांत भगत असे या २२ वर्षीय तरुणाचे नाव असून विकास जाधव असे त्याच्या १९ वर्षीय मित्राचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीसह पिता पुत्रांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद विठ्ठल कदम याने फिर्याद दिली आहे.

प्रेमाच्या वादात हकनाक गेला जीव

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रमोद कदम आणि आकाश भगत हे दोघे मित्र आहेत. दरम्यान एका मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून आदिनाथ भोसले आणि प्रमोद भगत यांच्यात शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील हनुमान मंदिर चौकात वाद सुरु होता. हा वाद मिटवण्यासाठी आकाश भगत, विपुल जाधव आणि त्याचे काही अन्य मित्र जाधववाडी येथे गेले.

यावेळी दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. यावेळी आदिनाथ व त्याच्यासोबत त्याचे वडील दिलीप भोसले व अल्पवयीन मुलगा असे तिघे मंदिर परिसरात उभे होते. यावेळी मित्राच्या प्रेम प्रकरणी मध्यस्ती करण्यास आलेल्या आकाश भगत व विपुल जाधव यांच्यावर आदिनाथ भोसले याने त्याचे वडील व अन्य एकाच्या मदतीने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या आकाश भगत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विटा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकाने तिन्ही आरोपींना केवळ बारा तासातच अटक केली.