क्राईम स्टोरी

अबब ! विमान आणि रेल्वेने येऊन ते करायचे घरफोड्या

आंतरराज्य टोळीला कोंढवा पोलिसांनी केली अटक

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षा, बस, दुचाकीने येऊन घरफोडी कऱणारे चोरटे आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र कोंढवा पोलिसांनी चक्क विमान व रेल्वेने राजस्थान, उत्तरप्रदेशातून पुण्यात येऊन घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून शहरातील चार घरफोड्या उघडकिस आणत ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाहिद खुर्शीत मन्सूरी (३३, निगडी, मुळ रा. बिजनोर उत्तररप्रदेश), रियासत रियाजूद्दीन मन्सूरी (२५, आळंदी रोड भोसरी), रिजवान निजामुद्दीन शेख (२५, अजमेर) फैसल जुल्फीकार अन्सारी (२२, बिजनोर उत्तरप्रदेश), मोहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी उर्फ सलमान अन्सारी (२७, बिजनोर उत्तरप्रदेश), मुशरफ यामीन कुऱेशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोंढवा येथील कुबेरा पार्क सोसायटीतील नरेश मल्होत्रा व शक्ती ननवरे यांचा महंमदवाडी येथील फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्यांनी ७१ हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सुरु असताना घरफोडी करताना चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. तसेच त्यांना एका ठिकाणावरून जाताना ऑटो रिक्षाने प्रवास केला असल्याची माहिती सीसीसटिव्ही तपासल्यावर समोर आली. त्यानंतर पोलिसांना रिक्षाचा क्रमांक अस्पष्ट दिसत होता. पुढील बाजूला ३१३ असा क्रमांक दिसत असल्याने पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध घेतल्यावर तो वाहिद मन्सूरी याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळीलेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी इतरांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चार घरफोडीच्या गुनह्यांची कबूली दिली. त्यांनी कोंढवा, वाकड, निगडी अशा तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार घरफोड्या केल्याचे कबूल केले. या घरफोड्यांमध्ये एकूण १० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैकी ४ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या अटक केलेल्यांमधील मोहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी उर्फ सलमान अन्सारी व नफासत वहिद अन्सारी हे विमानाने आणि रेल्वेन प्रवास करून शहरात येत होते. त्यानंतर इतर साथीदारांसोबत मिळून घरफोड्या करत होते.

ही कामगिरी अपर पोलीस आय़ुक्त सुनील फुलारी, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी राजस शेख, इक्बाल शेख, विलास तोगे, सुशील धिवार, सुरेंद्र कोळगे, योगेश कुंभार, निलेश वणवे, किरण मोरे, जगदीश पाटील, किशोर वळे, जयंत चव्हाण, अजिम शेख, पी. पांड़ुळे, उमाकांत स्वामी, आदर्श चव्हाण, उमेश शेलार यांच्या पथकाने केली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या