इस्रोच्या ‘या’ मोहिमेत प्रथमच महिला अंतराळवीर अंतराळात झेपावणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळात मानव पाठविण्यासाठीच्या ‘गगनयान’ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या यानात एका महिला अंतराळवीराचाही समावेश असणार आहे. इस्रोकडून नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
ही मोहीम इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असून इस्रो प्रथमच गगनयानात माणसाला अंतराळात पाठवण्याचा विचार करत आहे. या वर्षी गगनयानासाठी एक अंतराळ स्थानक(स्पेस स्टेशन) बांधण्यात येणार आहे. त्यानंतर २०२० च्या डिसेंबरमध्ये पहिली परीक्षा मोहीम राबवण्यात येईल. त्यानंतर जुलै  २१२१  मध्ये पुढील मोहीम राबवली जाईल. या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतरच डिसेंबर२१२१ मध्ये गगनयान अवकाशात झेपावेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने गगनयान मोहिमेला मंजुरी दिली आहे. या मोहिमेचा एकूण  खर्च १० हजार कोटी रुपये आहे.
अशी असेल मोहीम –
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) लवकरच त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या गगनयानाला अवकाशात सोडणार आहे. अंतराळात मानव पाठविण्याअगोदर डिसेंबर २०२० आणि जुलै २०२१ मध्ये दोन मानवरहित मोहिमा होणार आहेत. त्यासाठी अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात दिले जाईल आणि अद्यावत प्रशिक्षण रशियात होईल. अंतराळात पाठविण्यात येणाऱ्या तिघांच्या  पथकात एक महिला अंतराळवीराचा समावेश असेल, अशी माहिती  इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी शुक्रवारी दिली आहे.
ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात माणसाला पाठवणारा भारत चौथा देश ठरेल.स्रोने आजतागायत १७ अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत. ज्यात ७ लाँच व्हेइकल आणि ९ अंतराळयानांचा समावेश आहे. यातील एक मोहीम दुर्दैवाने अयशस्वी ठरली आहे. २०१८ मध्ये इस्रोने २ जीएसएलव्ही आणि एमके-३ , जीसॅट-११  हा उपग्रह इत्यादींचे प्रक्षेपण केले होते.