आयटी इंजिनिअरला हवी होती बुलेट, पैशासाठी पत्नीचा करायचा छळ

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत यासाठी आयटी इंजिनिअरने आपल्या पत्नीचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत वानवडी पोलिसांनी 28 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आयटी इंजिनिअर सह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सदर महिलेचे हल्लीच लग्न झाले आहे. महिलेचा पती विक्रम गाडे हा मुंबई येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. गाडे हा महंमदवाडी परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. आठवड्यातून दोन दिवस तो घरी येतो. विक्रमला बुलेट हवी असल्यामुळे त्याने व त्याच्या कुटूंबियांनी विवाहितेला माहेरवरुन पैसे आण असा तगादा लावला होता. मात्र पत्नीने पैसे आणण्यास नकार दिला, त्यावरुन त्यांनी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. एवढेच नाही तर विक्रम गाडे याने सदर महिलेशी विवाह करताना खोटी माहिती दिली. आरोपीचे वय कमी असल्याचे व पतीला आजार असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी लपवून ठेवल्याचा आरोप देखील फिर्यादी महिलेने केला आहे. लग्नानंतर जेव्हा हा प्रकार समजला तेव्हापासून आरोपींनी महिलेला त्रास देण्याास सुरूवात केली. सदर प्रकरणाचा अधिक तपास वानवडी पोलीस करीत आहेत.