रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट डायरेक्ट करणार फराह खान 

मुंबई : वृत्तसंस्था – गोलमाल, सिंघम चेन्नई एक्सप्रेस आणि नुकताच सुपरहिट झालेला ‘सिम्बा’ चित्रपटाची निर्मिती करणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच अ‍ॅक्शन, कॉमेडी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि कलाकार अजून गुलदस्त्यात आहे. मात्र लवकरच त्याचीही घोषणा होईल. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. रोहित शेट्टी प्रॉडक्शनचा हा चित्रपट फराह खान दिग्दर्शित करणार आहे.

अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर पेजवरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘इट्स ऑफिशियल, रोहित शेट्टीने आपल्या आगामी चित्रपटासाठी फराह खानला साईन केले आहे’, असे तरणने लिहिले आहे.

मध्यंतरी असे वृत्त होते कि रोहित शेट्टीने एका साऊथ चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहे. पण या वृत्ताला रोहितने फेटाळून लावले होते. आता फराह खान रोहितच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर या चित्रपटात प्रेक्षकांना नक्कीच वेगळ्या प्रकारचे डायरेक्शन पहायला मिळेल.

रोहित शेट्टी सध्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.