जेलमधून पळून जाण्यासाठी कैद्याने लढवली विचित्र शक्कल

कोलकाता : वृत्तसंस्था-  पोलिसांच्या तावडीतून सुटून जाणासाठी कैदी वेगवेगळ्या मार्गाची अवलंब करत असतात. मात्र, पश्चिम बंगालमधील एका कैद्याने जेलमधून पळून जाण्यासाठी विचित्र मार्ग अवलंबला. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. तो जवळून पळून जात असताना देखील पोलिसांनी त्याला पकडले नाही.

या कैद्याने तुरुंगातून पळून जाण्यासाठी स्वतःच्या अंगावर मलमूत्र लावून घेतले. त्यानंतर इतर कैद्यांवरही मलमूत्र फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर कैदी स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागले. त्या कैद्याच्या शरीराला दुर्गंध असल्याने पोलिसही त्याला रोखू शकले नाहीत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने तुरुंगातून पलायन केले.

पश्चिम बंगालच्या तोपसिया पोलीस ठाण्यात ही विचित्र घटना घडली आहे. मोहम्मद जब्बीर असे या कैद्याचे नाव असून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली आहे. त्याला तोपसियातील तुरुंगाच्या एका बराकीत ठेवण्यात आले होते. कैद्यांना बराकीतच प्रातर्विधीसाठी सोय केलेली असते. बराकीतील एका कोपऱ्यात झाकलेल्या शौचकूपात कैद्यांना प्रातर्विधी करावा लागतो. मात्र, काल जब्बीरने या शौचकूपाचा वापर न करता उघड्यावरच प्रातर्विधी केले.

त्यानंतर तेथील मलमूत्र त्याने स्वतःच्या शरीराला फासले. बराकीतील इतर कैद्यांवरही तो मलमूत्र फेकू लागला. त्यामुळे इतर कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना बोलावले. बराकीत दुर्गंध परसल्याने कैद्यांना तिथे थांबणे कठीण झाले. दुर्गंधीमुळे जब्बीरला पकडण्याची हिंमत पोलिसही दाखवत नव्हते. जब्बीरने याच परिस्थितीचा फायदा घेत सफाई कर्मचाऱ्याला धडक देत त्याला बाजूला फेकले आणि पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, दुर्गंधीमुळे त्याला कोणीही पकडले नाही. त्यामुळे तो तुरुंगाबाहेर पळण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करुन या कैद्याला सियालदाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुन्हा अटक केली. त्याची सफाई कामगाराकडून सफाई करुन पुन्हा जेलमध्ये त्याची रवानगी केली. या घटनेमुळे कैद्यांनी पळून जाण्यासाठी वेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत.