तथाकथित ‘मामी’ साेबत झेंगाट ; मामाकडून भाच्याचा खून

दिल्ली : वृत्तसंस्था- भाच्याने गर्लफ्रेंडशी मैत्री केल्यामुळे चिडलेल्या मामाने भाच्याचा खून करुन मृतदेह बाल्कनीत पुरला. घराचे नुतनीकरण करत असताना मानवी सांगाडा सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. तब्बल तीन वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी मामाला पोलिसांनी हैद्राबादमधून अटक केली.

ओडिशातील गंजम गावातील रहिवासी असलेला विजय कुमार महाराणा (वय ३७) हा २०१२ साली बीसीएची पदवी घेतल्यानंतर दिल्लीत आला. दिल्लीत आल्यावर तो नोएडातील बीपीओमध्ये काम करु लागला. २०१५ मध्ये त्याचा भाचा जय हा देखील हैदराबादवरुन दिल्लीत आला. त्याला गुरुग्राममध्ये नोकरी लागली होती. तो दिल्लीत विजय कुमार सोबतच राहत होता. यादरम्यान विजयकुमारचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. जयचीही विजयकुमारच्या प्रेयसीशी ओळख झाली. जय विजयकुमारच्या प्रेयसीशी गप्पा मारायचा. पण यावर विजयकुमारचा आक्षेप होता. त्याचा जयवर संशय बळावला होता. याच संशयातून ७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्याने जय झोपलेला असताना त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याने जयचा मृतदेह घरातील बाल्कनीत पुरला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने तिथे रोपटे लावले.
हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याने बहिणीला फोन करुन जय बेपत्ता असल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोलिसांकडे जय हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली. पोलिसांनी जयचा शोधही घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने ही केस बंद होण्याच्या मार्गावर पोहोचली होती. जयचा मृतदेह ज्या फ्लॅटमधील बाल्कनीत पुरला होता, ते घर विजयकुमारने भाड्यावर घेतले होते. दिल्लीतील चाणक्य प्लेस- १ मधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे घर होते. हत्येच्या काही दिवसांनंतर विजयकुमारने ते घर सोडले. यानंतर त्याने कुटुंबातील सर्वांशी संबंध तोडले. मोबाईल नंबर बदलला आणि बँक खात्याचा वापरही बंद केला.

ऑक्टोबर २०१८ मध्ये चाणक्य प्लेस- १ मधील त्या घरात नुतनीकरणाचे काम सुरु झाले. यादरम्यान कामगारांना बाल्कनीत मानवी सांगाडा सापडला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सखोल चौकशीत हा मृतदेह जयचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी आता विजयकुमारचा शोध घ्यायला सुरुवात केली. विजयकुमार दिल्लीतून बाहेर पडल्यावर वारंवार शहर बदलत होता. सध्या तो हैदराबाद असावा, अशी शक्यता विजयकुमारच्या एका मित्राने पोलिसांसमोर वर्तवली. विजयकुमार प्रेयसीसह राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी आधी त्याच्या प्रेयसीचा शोध घेतला आणि तिच्या आधारे पोलीस विजयकुमारपर्यंत पोहोचले.