भाविकांची जीप ३०० फूट खोल दरीत कोसळून अपघात, ३ जणांचा मृत्यू , १२ जण जखमी 

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भोजलिंग देवस्थान डोंगरावरून जात असताना भाविकांची जीप दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले असून १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे.

तब्बल ३०० फूट खोल दरीत जीप कोसळून  हा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी ९.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे  (सांगली), मनिषा आटपाडकर, कंठेमाला कलास आटपाडकर (सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील डोंगरावर भोजलिंगचे देवस्थान आहे. शनिवारी पोर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे भोजलिंगाच्या डोंगरावरून खालच्या बाजूनं प्रवास करताना जीप खोल दरीत कोसळली.
आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून जीपने (एमएच १० सी ३४४१) तेरा भाविक भोजलिंग डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने पुन्हा आपापल्या गावी निघाले होते. डोंगरावरून खाली येत असताना अचानक जीपचे चाक घसरले. या घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्यामुळे जीप थेट ३०० फूट दरीत कोसळली. या जीपचे हूड उघडे असल्यामुळे इतर प्रवासी जीपमधून बाहेर फेकले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली.
या अपघाताची माहिती मिळताच वरकुटे मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डोंगरावर जाणा-या नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांकडून आणि बचावकार्य सध्या सुरू असून जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत.