तर एकालाही सोडणार नाही, मी सुद्धा राजपूत…!

मुंबई : वृत्तसंस्था – येत्या २५ जानेवारीला कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाला कडाडून विरोध, केला आहे. ‘पद्मावत’या चित्रपटाला विरोध करणारी तीच ती करणी सेना. या सेनेकडून कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाला विरोध होत असताना या सेनेकडून कंगनाला धमक्या येत असल्याचेही कळतेय.
कंगनाने करणी सेनेला प्रतिआव्हान दिलेय. करणी सेनेनं मला धमक्या देणे थांबवले नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मी देखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे,अशा इशारा कंगनाने दिला आहे.

एका मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर कंगनाने निषेध नोंदवला. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावरून मला करणीसेनेकडून धमक्या येत आहेत. चार इतिहासकारांनी शिवाय सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे, असे असताना करणी सेनेच्या विरोधाचे कारण काय, असा सवाल तिने केला आहे.

यापूर्वी करणी सेनेनेसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात जोरदार निदर्शने केली होती. या विरोधामुळे ऐनवेळी भन्साळींना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवले आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात एका गाण्यात राणी लक्ष्मीबाई  यांना नृत्य करताना दाखवले गेले आहे. हे सभ्यतेला धरून नसल्याचा  करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली गेलीच तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,असा इशारा या पत्रात दिला गेला आहे.