मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसने केला भाजपचा पराभव

मलकापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कराड तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला पराभूत करत काँग्रेसने सरशी केली आहे. अत्यंत अतीतटीच्या सामन्यात अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची बुज राखली आहे. काँग्रेसला १४ तर भाजपला ५ जागी विजय मिळाला आहे. काँग्रेसच्या नीलम येडगे यांनी २७०मताधिक्याने भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांचा पराभव करत मलकापूरच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून आपले नाव कोरले आहे.

नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग चारमध्ये भाजपाच्या उमेदवार अवंती रामचंद्र घाडगे आणि काँग्रेसच्या उमेदवार भारती दिलीप पाटील यांना समान मते पडली. त्या ठिकाणी प्रत्येकी ६६२ मते मिळाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांच्या नेतृत्वात चिठ्ठी पद्धतीने विजयी उमेदवार निश्चित करण्यात आला. यात काँग्रेसचे नशीब बाजी मारून गेले. या ठिकाणी काँग्रेसच्या भारती दिलीप पाटील या विजयी झाल्या आहेत.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले या दोघांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मैदान राखले आहे हे आता निकालावरून स्पष्ट झाले आहे.