दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याविषयी काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी निवडणुकीपूर्वी हा हल्ला कसा झाला असं धक्कादायक विधान केलं होत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानं या घटनेचं दुःख कमी होणार नाही. पहिल्यांदा आपल्या देशातील दहशतवाद संपवा असं कुमार स्वामींनी वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर विरोधक सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचं सांगितलं होतं. या दहशतवादी हल्ल्याचं कोणतंही राजकारण होता नये असं देखील राहुल यांनी म्हटलं होतं. मात्र विरोधकांमध्ये याबाबत एकमत दिसत नाही. कुमारस्वामी म्हणाले, ‘पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानं या घटनेचं दुःख कमी होणार नाही. सरकारनं अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक पावलं उचलली पाहिजेत. पहिल्यांदा आपल्या देशातील दहशतवाद संपवा, असं ते मोदींना उद्देशून म्हणाले आहेत.

जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे गुरुवारी घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले आहेत. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्‍ला आहे.पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला किंमत मोजावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिला. या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींवरील कारवाईसाठी वेळ, जागा आणि स्वरूप ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पंतप्रधानांनी सुरक्षा दलांना दिले आहे.