वाट चुकलेल्या ६७ मुलांचे ‘खाकी’ ने घेतले पालकत्व

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास ‘दिशा’ हे नाव देण्यात आले आहे. कळत-नकळत ‘वाट’ चुकलेल्या ६७ मुलांना जिल्हा पोलीस दलाने गेल्या सहा महिन्यांत ‘दत्तक’ घेतले आहे. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहून नवी ‘दिशा’ दाखविण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. राज्यात प्रथमच सांगलीत पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

दिशा उपक्रम 

या उपक्रमामध्ये ‘स्नेहालय फौंडेशन’ व ‘खाकी प्रेस इंडिया’ या दोन सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्यात आले आहे. पोलीस दलातील ‘टीम’ व संघटनांचे पदाधिकारी धनंजय आरवाडे, प्रशांत पाटील, अ‍ॅड. मुक्ता दुबे यांनी संयुक्तपणे सांगली, मिरजेतील अहिल्यानगर, वाल्मिकी आवास, इंदिरानगर झोपडपट्टी, संजयनगर, ख्वाजा वसाहत या ठिकाणी उपेक्षित व दुर्लक्षित मुलांचा शोध घेतला. या मुलांची तसेच त्यांच्या पालकांची घरी जाऊन भेट घेतली. ‘दिशा’ उपक्रमाची माहिती त्यांना दिली. ५० मुले या उपक्रमात सहभागी होण्यास तयार झाली. १४ ते १७ वयोगटातील ही मुले होती.

या मुलांना कर्मवीर चौकातील दादुकाका भिडे निरीक्षण गृहात आणण्यात आले. तिथे निरीक्षण गृहातील मिलिंद कुलकर्णी यांच्यासह धनंजय आरवाडे व अ‍ॅड. मुक्ता दुबे यांनी मुलांचे समुपदेशन केले. मुलांचा शोध घेऊन समुपदेशन करण्यात तीन महिन्यांचा कालावधी गेला. ५० पैकी २५ मुले समुपदेशनानंतर विविध कोर्सचे प्रशिक्षण घेण्यास तयार झाली. त्यांना एका इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. एमएससीआयटी, हार्डवेअर, ड्रायव्हिंग, सॉप्टवेअर, मोबाईल दुरुस्ती आदी कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील १७ मुले प्रशिक्षण घेऊन तयार झाली. यातील दोन मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांंना तातडीने नोकरीही मिळवून दिली आहे. १७ मुलांची ही बॅच यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आणखी काही मुलांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे.