खवल्या मांजराची तस्करी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खवल्या मांजर (पॅन्गोलिन) विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखा शोध कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० लाख रुपयांचे खवले मांजर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) मुंब्रा पनवेल रोडवरील विपुल लॉजजवळ करण्यात आली.

सागर मारुती पवार (वय-२३ रा. साई मल्हार बिल्डींग, विरार पुर्व जि. पालघर), अब्दुल जलील युनुस महामृत (वय-५४ रा. मुपो साई, ता. माणगाव, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंब्रा पनवेल रोडवर दोन जण दुर्मिळ प्रजातीचे आणि नामशेष होत असलेले खवल्या जातीचे मांजर विक्री करण्यासाठी दोन जण येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शरद तावडे यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे वनक्षेत्रपाल यांना बरोबर घेऊन पोलिसांनी सापळा रचला.

विपुल लॉजजवळ सागर पवार आणि अब्दुल महामृत हे संशयास्पदरित्या दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची सॅक तपसाली. सॅकमध्ये एका प्लास्टिकच्या गोणपाटामध्ये एक दुर्मिळ जातिचे खवल्या मांजर दिसले. पोलिसांनी मांजर जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मुधकर पांडे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रविण पवार, पोलीस उपायुक्त दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ एन.टी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव आणि त्यांच्या पथकाने केली.