खंडणीसाठी 16 वर्षीय मुलाचे अपहरण, खून करुन मृतदेह पुरला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वारजे परिसरामध्ये एका १६ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. निखिल अनंत आंग्रोळकर (वय – १६) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून याप्रकरणी निखिलच्या घराशेजारी राहणाऱ्या बिनयसिंग विरेंद्रसिंग रजपूत (वय २२) याला पोलिसांनी अटक केली आहे. निखिलचा खून करुन आरोपीने त्याचा मृतदेह चांदणी चौक ते डक्कर खिंड दरम्यान रस्त्याच्या कडेला खड्डा खोदून पुरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगा हा नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने अनंत आंग्रोळकर यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत दिसल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे काबुली दिली.

घटनेच्या दिवशी दुचाकीवरून घेऊन जात असताना निखिलने वडिलांना फोन करून जबरदस्तीने घेऊन जात आल्याचे सांगितले. आरोपीने निखिलला एनडीए रोडवरील दोडके फार्म हाऊस जवळ घेऊन गेला. याठिकाणी त्यांच्या मध्ये वाद झाला. आरोपीने निखीलचा गळा दाबून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. यामध्ये निखिल गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला नेऊन खड्डा खोदला आणि त्या मध्ये मृतदेह पुरला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.