तुरुंगात शिक्षा भोगत असूनही पोळकडे मोबाईल आणि रिव्हॉल्वर ?

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन – कोल्हापूरमध्ये असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या ढिसाळ कारभाराची ग्वाही देणारी एक घटना समोर आली आहे. तुरूगांत शिक्षा भोगत असलेला एक आरोपी चक्क रिव्हॉल्वरसदृश वस्तू घेऊन कोठडीत वावरत असल्याचं चित्र एका व्हिडीआेद्वारे समोर आलं आहे. वाईचा ‘कसाई’ अशी ओळख असणाऱ्या संतोष पोळ असं या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे संतोष पोळने स्वतःच मोबाईल फोनच्या माध्यमातून हे व्हिडिओ शूट केलं आहे. इतकंच नाही तर  या मोबाईल फोनच्या माध्यमातून त्यानं स्वतःची मुलाखत देखील शूट केल्याचं समजत आहे. सदर घटनेनंतर  तुरूंगवास भोगत असलेल्या या पोळकडं चित्रिकरणासाठी मोबाईल फोन कुठून आला? तसंच त्याच्याकडं आढळलेली रिव्हॉल्वरसदृश वस्तू ही खरीखरी रिव्हॉल्व्हर आहे की खोटी? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

सदर  व्हिडीआेमुळे कळंबा कारागृहाच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली गेलीत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण तुरूंग अधिकारी चंद्रकांत आवळे यांनीच आपल्याला ही रिव्हॉल्व्हर दिली, असा गौप्यस्फोट संतोष पोळनं या व्हिडिओ क्लीपमध्ये केला असल्याचं दिसत आहे. परंतु हा दावा कितपत खरा आहे? याशिवाय सहाजणांची अत्यंत क्रूरपणं हत्या करणाऱ्या संतोष पोळसारख्या सिरीयल किलरकडं मोबाईल आणि रिव्हॉल्व्हरसारख्या वस्तू कुणी पोहचवल्या? असे एक ना अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित केले जाताना दिसत आहेत.

कोण आहे संतोष पोळ ?
वाईमध्ये तब्बल सहा खून करणारा खूनी म्हणजे संतोष पोळ. इतकेच नाही तर ६ खून करून त्या मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावली त्याने लावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या घराच्या मागेच खड्डे खोदून त्यात हे मृतदेह पुरले असल्याचे समजत आहे. अत्यंत क्रूरपणे त्याने या हत्या केल्या आहेत. वाईचा ‘कसाई’ अशीच या संतोष पोळची आेळख आहे.