कोंढवा पोलिसांना सीपीआरचे प्रशिक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हृदयविकार आणि अपघात झाला तर बऱ्याचदा रुग्णांना प्राथमिक उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. या परिस्थितीत रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे असते. रुग्णावर कशाप्रकारे प्राथमिक उपचार करावेत याचे प्रशिक्षण कोंढवा पोलिसांना प्रात्यक्षिकातून देण्यात आले. आज (बुधवार) कोंढवा पोलीस ठाण्यात ‘अपत्कालीन वेळी रुग्णाला मदत’ या विषयावर सीपीआरचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्षिकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भारती विद्यापीठ हॉस्पिटलकडून कोंढवा पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया अग्निहोत्री, डॉ. उत्सव माने, डॉ. सुषमा श्रीयान, डॉ. अश्वीनी घाटगे, आपत्कालीन व्यवस्थापक शिरिष कुलकर्णी, मानिंग चव्हाण यांनी उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन करुन प्रात्यशिक करुन दाखवले.

हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रशिक्षणामध्ये रस्त्यावरील अपघात व रुग्णाला अचानक येणारा हृदयविकाराचा झटका यावेळी रुग्णाची अवस्था व त्याचेवर तातडीने उपचार कसे करावे याची माहिती पोलिसांना दिली. अपघाताच्या वेळी पोलीस घटनास्थळी असतात. त्यामुळे सीपीआर कसा द्यावा याची माहिती पोलिसांना असावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उप निरीक्षक चाऊस, तसेच कोंढवा वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कोंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.