शैक्षणिक

सरकारी शाळांची अवस्था दयनीय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय शिक्षण संस्था आणि राष्ट्र सेवा दलाचे शिक्षण प्रशासक मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘मराठी शाळांचे भवितव्य ‘या विषयावरील पुण्यात चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात माजी संमेलनाध्यक्ष आणि माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शिक्षकांचे कान टोचले. सरकारी शिक्षकांसाठी सातवा वेतन लागू होत आहे. दुसरीकडे खासगी शाळांमधील शिक्षक थोडक्या पगारात काम करतात. तिथे तुलनेने चांगले शिक्षण दिले जाते. सरकारी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. याला सरकारी धोरणं जबाबदार आहेतच, पण शिक्षकही जबाबदार आहेत, अशी टीका देशमुख यांनी केली.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, ‘खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमधील शिक्षकांचे पगार अधिक आहेत. सरकारी शाळेतील शिक्षकाला धड मराठी कळत नाही. शिक्षकांची शिक्षणावरची निष्ठा राहिली नाही. मग, मुलांना शिक्षा करण्याचा, नापास करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आपण राष्ट्राची हानी करत आहोत याचा विचार कधी केला आहे का?

केवळ पाच टक्के विद्यार्थी कौशल्य शिक्षण घेत आहेत. विज्ञान शिक्षण तर लांबच आहे. प्रादेशिक भाषेत विशेषत: मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे. शिक्षक कमी पडत आहेत. कारण शिक्षणावरची निष्ठा आपण गमावून बसलो आहोत. सावकार शिक्षक झाले आहेत. पुणे शहर, जिल्हा येथेही गुणावत्ता कमी असेल तर इतर जिल्ह्यांचे काय? आपण साधे प्राथमिक शिक्षण देऊ शकत नाही, अशी खरडपट्टी देशमुख यांनी काढली.

भारतीय शिक्षण संस्था (जे. पी. नाईक प्रशिक्षण केंद्र) येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी समाजवादी अध्यापक सभेचे शरद जावडेकर होते.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या