आहे-नाही त्या शब्दात लक्ष्मीकांत देशमुखांनी संमेलनाच्या आयोजकांना झापलं

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्याच्या प्रकाराचा लक्ष्मीकांत देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यंदाच्या संमेलन आयोजकांना सुनावलं आहे. तसंच देशमुखांनी दिलेले निमंत्रण मागे घेतल्याचा निषेध व्यक्त केला.

यजमानावर टीका करायची नसते, हे मला मान्य आहे. मात्र, मूळ उद्घाटकाला न बोलावून शिष्टाचार पाळला गेला नाही, त्यामुळे माझ्याकडे जितकी शब्दप्रभूता आहे, ती वापरुन या निमंत्रणवापसीचा मी निषेध करतो, असं म्हणत लक्ष्मीकांत देशमुख यांनी निषेध नोंदवला. समजा त्या इथे आल्या असत्या, त्यांनी भाषण केलं असतं, तर काही आभाळ कोसळलं नसतं किंवा राजकीय भूकंप झाला नसता. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणं पाप आहे, दुर्दैवाने त्यात कळत-नकळत मीही सहभागी, त्याबद्दल खंत आहे, माझी मान खाली गेलेली आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गेली 50 वर्षे नयनतारा सहगल झगडत आहेत, आवाज उठवत आहेत. 1975 च्या आणीबाणीचाही त्यांनी निषेध केला होता. त्यांना एका मोठ्या देशाचं राजदूतपद मिळणार होतं, तेही त्यांनी नाकारलं, त्यावर त्यांनी पाणी सोडलं होतं. इतक्या त्या निर्भीड आहेत. 1984 ला जे शिखांचं हत्याकांड झालं, त्यावर त्यांनी अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला होता. अलीकडे महाराष्ट्रातील विचारवंतांच्या हत्या झाल्या, दादरीत गोमांस ठेवल्याने हत्या झाली, या घटनांचा निषेध म्हणून त्यांनी पुरस्कार परत केला होता. त्या नयनतारा सहगल या खऱ्या अर्थाने कलावंत आणि लेखकांचा धीरोदत्त आणि नैतिक आवाज आहेत, असं लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलं.