सांगलीतील गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित एलसीबीच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

कवठेमहांकाळ येथील तरुणावर गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला तळेगाव दाभाडे आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संयुक्तीक कारवाई करुन अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.८) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील उर्से टोलनाक्यावर करण्यात आली. रमेश आप्पा खोत (वय-४२ रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मुकुंद उर्फ सोन्या दुधाळ (रा. कोंगनोळी) याच्यावर २५ जुलै रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आत्तापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20120ed5-cb95-11e8-809f-936047171369′]
याप्रकरणी यापूर्वीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिनेश राजमाने, दत्तात्रय भूसनूर, योगेश लिगळे यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून मोटारसायकल, दोन हेल्मेट, देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या दुधाळ हा मोटरसायकलवरून कवठेमहांकाळहून कोंगनोळीकडे जात होता. त्यावेळी तो हिंगणगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ थांबला होता. त्यावेळी मोटारसायकलवरून पाठीमागून आलेल्या दिनेश राजमाने, दत्तात्रय भुसनूर यांनी अगदी जवळून दुधाळवर गोळीबार केला होता. याप्रकरणात रमेश खोत याने या हल्ल्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.

रमेश खोत तळेगाव दाभाडे परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने तळेगाव दाभाडे पोलिसांच्या मदतीने पुणे-बंगळुरू महामार्गावरील उर्से टोल नाका येथे सापळा लावला होता. सोमवारी सायंकाळी तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B07G5BTYC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ffe83a5-cb95-11e8-9c76-098e62efb42f’]
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, संदीप पाटील, अरूण सोकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रमेश खोत रेकॉर्डवरील गुन्हेगार…

अटक करण्यात आलेला संशयित रमेश खोत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथील सरपंच युवराज पाटील यांच्या खूनप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने सोन्या दुधाळवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता.