आंबेगाव तालुक्यातील शेळ्यांना फस्त करणारा बिबट्या अखेर जेरबंद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये एका बिबट्याची मोठी दहशत होती. या बिबट्याने पाच शेळ्या ठार केल्या होत्या. या बिबट्याला  वनविभागाने बुधवारी पिंजरा लावून जेरबंद केले. मात्र या परिसरात वावर असणारे दोन बिबटे अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून पकडण्यात आलेल्या या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

मागच्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. कळंब येथील धरणमळा परिसरात गेल्या महिनाभरापासून तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या परिसरातील शेळ्या, गायी, कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाबूनाथ कहडने या शेतकऱ्याच्या ५ शेळ्या बिबट्याने ठार केल्या आहेत. यामुळे वनविभागाने रात्री याठिकाणी पिंजरा लावून दोन वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला. या बिबट्याला पकडल्यानंतर अन्य दोन बिबटे रात्रभर बसून असल्याचे एका स्थानिक महिलेने सांगितले.

आज सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी बिबट्याची रवानगी  जुन्नर तालुक्यातल्या माणिकडोह येथील निवारण केंद्रात केली. मात्र, अजूनही दोन बिबटे या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.