भाजपचा प्रताप… आता जन्मठेपेच्या आरोपीला केले पदाधिकारी

नागपूर : पोलीसनामा आॅनलाइन – भाजपने गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटाच लावला आहे. मतदान वाढविण्यासाठी असे केले जात असल्याचा निर्लज्जपणाचा खुलासाही या पक्षाचे नेते करत आहेत. आता तर भाजपने कमालच केली असून मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये जन्मठेप झालेल्या एका आरोपीला चक्क पदाधिकारी केले आहे. या पराक्रमानंतर पक्षाला प्रामाणिक कार्यकर्त्यांऐवजी गुंड, गुन्हेगारांची गरज आहे काय? अशी चर्चा नागपुरात सुरू झाली होती. मात्र, जनतेचा संताप पाहून अखेर या गुन्हेगाराला पक्षातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपच्या शहरातील गणमान्य पदाधिकाऱ्यांनी एका हत्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या डल्लू सरदार या व्यक्तीला झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष बनविले. डल्लू व त्याच्या सहकाऱ्यांनी २०१२ मध्ये सूरज यादव या तरुणाची हत्या केली होती. त्यावेळी डल्लूच्या संपूर्ण टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. २०१६ मध्ये सत्र न्यायालयाने डल्लू याच्यासह दहा जणांना हत्या प्रकरणात दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हा तुरुंगात गेलेला डल्लू सध्या उच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या जामिनावर बाहेर आहे.

मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस नगरमधून प्रारंभ 

भाजप शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, डल्लू सरदार याला तत्काळ निलंबित करावे व याबाबतचे पत्र प्रसारमाध्यमांना द्यावे, अशी सूचना झोपडपट्टी आघाडीच्या अध्यक्षांना देण्यात आली आहे. डल्लू सरदार याची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी त्याची पार्श्वभूमी सांगण्यात आली नव्हती. आता त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांना पक्षात पद देऊ नये, असा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या भाजपाच्या बैठकीत घेण्यात आला होता व तसे आदेशही सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, कोहळे आणि त्यांच्या टीमने याकडे दुर्लक्ष चालविले आहे. पाचमहिन्यांपूर्वी मोक्काचा आरोपी असणाऱ्या विनोद मसराम याला भाजपच्या आदिवासी आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. शिवाय, तो पूर्वी गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आता नाही, असे सांगत भाजपातील काहींनी त्याचा बचावही केला होता. त्यानंतर आता भाजपा उत्तर नागपूरच्या झोपडपट्टी आघाडीच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र सिंह दिगवा ऊर्फ डल्लू सरदार या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इसमाची नियुक्ती केली.