ज्याने जग दाखवले त्याचाच केला खून, मुलाला जन्मठेपेची शिक्षा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शेताची वाटणी बरोबर केली नाही म्हणून बापाचा निघृर्ण खून करणाऱ्या मुलास जन्मठेप व हजार रुपये दंड अशी शिक्षा तिसरे जिल्हा न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी सुनावली आहे.

अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील गुणाजी रुकमाजी दुधमल-७० या वृध्दाला दोन मुले आणि आठ एकर शेती होती. मुलांनी शेताची वाटणी करा म्हणून तगादा लावल्याने त्यांनी २ एकर संतोषच्या नावे, २ एकर दुसऱ्या मुलाला व उर्वरित ४ एकर स्वत:ला ठेवून घेतली. परंतु ही वाटणी बरोबर नसल्याने संतोषने बापासोबत वाद घालणे सुरु केले. बामणी शिवारातील मालोजी चिंतले यांच्या शेतासमोर गुणाजी ३० एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी पावणे सहा ते सहा दरम्यान जात असताना आरोपी संतोषने गुणाजीला रोखले आणि शेताची वाटणी बरोबर केली नाही म्हणत रागाच्या भरात लिंबाच्या लाकडाने (लोखंडी खण असलेला) डोक्यावर घाव घातले. या हल्ल्यात गुणाजीचा मेंदूच बाहेर आला आणि ते जागीच ठार झाले.

या घटनेनंतर शेत मालक सुरेश मालोजी चिंतले यांनी अर्धापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती. या प्रकरणी तत्कालीन सपोनि अवचार व दीपक दंतुलवाड यांनी तपास करुन आरोपी संतोषला अटक करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नईम यांनी मदत केली. विशेष म्हणजे फिर्यादीसह तिघेजण फितूर होऊनही कलम १६४ नुसार तिसरे जिल्हा न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी आरोपी संतोषला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी शिक्षा भोगावी लागणार आहे अशी माहिती जिल्हा सरकारी वकील संजय लाठकर यांनी दिली.