स्विस बँकेकडे भारतीयांची पावले वळेनात ; लोन, डिपॉझिटमध्ये ३४.५ टक्के घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काळ्या पैशांच्या निमित्ताने स्विस बँकेचे नाव वेळोवेळी चर्चेत येत असते. मागच्या काही वर्षात स्विस बँकेत काळा पैसा लपविण्यासाठी धनाढ्य भारतीय पाठ फिरविली असल्याचे समोर आले आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील लोन आणि डिपॉझिटमध्ये ३४.५ टक्के घट झाली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी लेखी उत्तरातून राज्यसभेत दिली.

२०१३ ते २०१७ दरम्यान भारतीयांच्या स्विस बँकेतील लोन आणि डिपॉझिटमध्ये ८०.२ टक्के घट झाली आहे.  स्विस बँकेत जमा होणाऱ्या पैशांची लगेच माहिती मिळावी यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये करार झाला आहे.अर्थ राज्यामंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामध्ये ही माहिती दिली.

काय आहे करार –

स्विस नॅशनल बँकेचा करार बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सबरोबर (बीआयएस) झाला आहे. या करारानुसार केंद्र सरकारला स्विस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या पैशाबाबत माहिती मिळाली आहे. स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती सहजपणे मिळण्यासाठी भारत व स्वित्झर्लंडमध्ये करार करण्यात आला आहे. यामधील माहिती गोपनीय असणार असल्याचे शुक्ला यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. या करारानुसार सप्टेंबर २०१९ पासून स्विस बँकेतील खातेदारांची नियमितपणे केंद्र सरकारला दरवर्षी माहिती मिळणार आहे. यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये रहिवाशी झालेल्या भारतीयांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या भारतीयांना कराच्या जाळ्यात ओढणे केंद्र सरकारला शक्य होणार आहे.

का साठवला जातो स्विस बँकेत मोठ्या प्रमाणात पैसा –

स्वित्झर्लंड हा देश ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखला जातो, कारण येथे कितीही पैसा ठेवा, साठवा तुम्हाला त्यावर अगदी मामुली कर भरावा लागतो किंवा कर भरावाच लागत नाही.

१९३४ मध्ये या देशाने एक बँकिंग कायदा संमत केला, ज्यानुसार जर स्विस बँकेने त्यांच्याकडे असणाऱ्या खातेदारांची नावे आणि माहिती उघड केली तर तो कायदेशीर अपराध मानला जाईल. त्याबदल्यात त्या बँकेवर कठोर कारवाई करण्यात येईल.

स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये भारतीय लोक आपला काळा पैसा ठेवतात. कारण या बँकांमध्ये ग्राहकांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते. २०१६ मध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या पैशांमध्ये ४५ टक्के घसरण झाली होती.