लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चमध्ये ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यावर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यंदाचं २०१९ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सगळ्या राज्यांच्या निवडणूक आयोगांना फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकेत. याच वर्षात देशाच्या म्हणजेच लोकसभा निवडणुका होणार आहेत. आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास महाराष्ट्राच्या म्हणजेच विधानसभा निवडणुका होणार आहेत असेही समजत आहे.

आता मार्चमध्ये निवडणुका जाहीर होणार का? झाल्यास किती टप्प्यात जाहीर होणार? निकाल कधी लागणार हे सगळे समजायचे आहे. सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून ला संपतो आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील. या निवडणुका किती टप्प्यात होणार? निकाल कधी लागणार हे अजून कळायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. गेल्यावेळप्रमाणेच लोकसभा निवडणुकांसोबत आंध्रप्रदेश, आेडिसा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. भाजपा-शिवसेनेमध्ये युतीची तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडीची चर्चा सुरु आहे असेही समजत आहे.

डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये  पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने काँग्रेसचे कार्यकर्तेही जोशाने निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे या निकालांमधून धडा घेत भाजपाने तयारी सुरु केली आहे. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार? जनता पुन्हा मोदींना कौल देणार की वेगळंच चित्र समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अर्थात नमो VS रागा अशीच लढाई पाहण्यास मिळणार आहे. यावेळची लढाई पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे हे नक्की.